अहिल्यानगर: सख्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: सख्या बहीण-भावाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू.

लोणी: राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे सख्या बहीण-भावाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. गोगलगाव येथे काही दिवसांपूर्वीच दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सलग दोन घटना घडल्याने गावातील नागरिक धास्तावले आहेत.
रविवारी शाळेला सुटी असल्याने कु. दिव्या पोपट चौधरी (वय 8) व तिचा सख्खा भाऊ शुभम पोपट चौधरी हे घरीच होते. गोगलगावच्या पश्चिमेला असलेल्या गोर्डे तलावाजवळच त्यांचे राहते घर असल्याने तलावाकडे जाणे त्यांच्यासाठी नवीन नव्हते. पण रविवारी काळाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दुपारच्या वेळेस दोघे भाऊ-बहिण तलावाकडे कधी गेले, कुणालाच कळले नाही. तिसर्या प्रहराला मुलं दिसत नव्हती, म्हणून घरच्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. या तलावात पावसाचे पाणी साचलेले होते. तलावाच्या भिंतीवर मुलांच्या चप्पल दिसून आल्या. संशय आल्याने तलावाच्या पाण्यात बघितले असता दोघेही पाण्यात बुडालेले होते, हे हृदयद्रावक दृश्य नजरेस पडले. जवळच्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती गावात आणि परिसरात समजताच लोकांनी चौधरी यांच्या घराकडे गर्दी केली. चौधरी कुटुंबाची दोन्ही मुले जगात नाहीत, याचा विश्वास कुणालाही बसेना. सर्वत्र दुःख आणि हळहळ पसरली. पोपट मंजाबापू चौधरी आणि त्यांची पत्नी यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. दोघेही निशब्द झाले. चौधरी कुटुंबाच्या दुःखाचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. ज्यांच्यावर असा प्रसंग ओढवतो, त्यांनाच ते समजू शकते. असा प्रसंग काही दिवसांपूर्वी गावातील आणखी एका चौधरी कुटुंबावरही ओढवला होता. ती घटना ताजी असताना पुन्हा तशीच घटना घडली.
दोन्ही मुलांचे शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी सकाळी गोगलगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. मयत मुलांचे वडील लोणी येथील प्रवरा फळे भाजीपाला संस्थेत सुरक्षा कर्मचारी आहेत तर आई प्रवरा रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी करते. या घटनेमुळे आनंदी जीवन जगत असलेल्या या कुटुंबाच्या जगण्याची उमेदच खचली आहे. गावातील नागरिकांनी या दोन घटनांवरून जागरूक होऊन आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Breaking News: Brother and sister drown in lake
















































