निळवंडेचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला- बाळासाहेब थोरात
Breaking News | Sangamner: निळवंडेचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर: निवडणुका संपल्या की इथले राजकारण संपते अशी परंपरा आहे. आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेतले सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण केले. कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारी निर्माण करण्यात आली. दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले हे एका वर्षात झाले नाही. ज्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत. निळवंडेचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून आपण मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणीही त्यांनी केली.
पिंपळे (ता.संगमनेर) येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते, तर व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, सोसायटीचे अध्यक्ष शिवनाथ कोटकर, सरपंच मीना कोटकर आदींसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भोजापूर चारी निर्माण झाली. ते स्वतः भर उन्हात चारी कामावर येऊन बसायचे. 1992 मध्ये कारखान्याने 82 लाख रुपये खर्च करून चारी तयार केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळा निधी चारीसाठी टाकला आणि पाणी दरवर्षी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न आपण केले.
यावर्षी पाऊस चांगला झाला या आनंदाची गोष्ट आहे. ही चारी मागील एक वर्षात झाली नाही, ज्यांना कधी चारी माहीत नव्हती ते आता येऊन भाषण करत आहेत. निळवंडे धरण जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला करत आहे. या भागाला पाणी मिळावे याकरीता आपण सातत्याने प्रयत्न केला असून निळवंडे कालव्यांमधून उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. यामध्ये निमोण, पळसखेडे, कर्हे, नान्नज दुमाला, सोनोशी, काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, तळेगाव, तिगाव, बिरेवाडी यांसह 11 गावांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर या मंडळीने उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या.
या उपसा जलसिंचन योजनेतून या भागाला पाणी देणे शक्य आहे, त्यासाठी आपण नियोजन केले होते. त्यामुळे तातडीने त्या सुरू कराव्यात. पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येईल तेव्हा आनंदच आहे आणि जनता हे खूप दिवसांपासून ऐकत आहे. सध्या शहरात व तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत. यामागे कोण आहे ते ओळखा? हे सर्व आपल्याला दुरुस्त करायचे असून सर्वांनी शाश्वत विकासाच्या पाठिशी भक्कम उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक बी. आर. चकोर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र कहांडळ व अनिल घुगे यांनी केले.
Breaking News: Bhojapur’s influence is so that people forget about Nilwande’s work Balasaheb Thorat
















































