Breaking News | Akole: महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून भंडारदरा धरणही याला अपवाद राहिलेले नाही.
भंडारदरा : महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून भंडारदरा धरणही याला अपवाद राहिलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात वरुण राजाची कृपादृष्टी कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे जायकवाडी धरणासह अनेक धरणे भरली नाहीत. त्यामुळे यंदाच्या भर उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रच तहानलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक तसेच अहमदनगरच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत यंदाचा पावसाळा बऱ्यापैकी होता. त्यामुळे नाशिक व अहमदनगरमधील धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा होता. त्यातच भंडारदरा धरणामध्ये मागील वर्षीच्या शिल्लक पाणीसाठ्यामुळे भंडारदरा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी पडल्याने धरण भरलेच नाही. परिणामी जायकवाडी धरणासाठी अहमदनगरमधील भंडारदरा व मुळा धरणासह नाशिकमधुनही पाणी झेपावले होते.
भंडारदरा धरणामधुन यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठाही अतिशय खालावला आहे. बऱ्याच वर्षामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भंडारदरा धरणाचा पाणीसाठी ५० टक्क्यापेक्षा खाली गेला असुन आजच्या मितीला भंडारदरा धरण ४४.३७ टक्के भरलेले आहे. भंडारदरा धरणामध्ये आजच्या तारखेला ४८९८ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी भंडारदरा धरण ७० टक्के भरलेले होते, तर धरणामध्ये ८७०४ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. भंडारदरा धरणाच्या वीजनिर्माण केंद्रातून ८३३ क्युसेकने विसर्ग सुरु होता. भंडारदरा धरणामधुन वीजनिर्माण केंद्रातुन आजही प्रवरा नदीमध्ये ८४० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
Web Title: Bhandardara Dam holds only such percentage of water
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study