सोमवारपासून जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा सुरु करणार
अहमदनगर | Ahmednagar: मेस्टाच्या राज्यपातळीवरील निर्णयाप्रमाणे नगर जिल्ह्यातही सोमवार, 17 जानेवारीपासून इंग्रजी शाळांचे वर्ग सुरू होणार असल्याचे असे मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी सांगीतले. दरम्यान, राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
राज्य सरकारने वाढत्या करोना रुग्णांमुळे 8 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा या बंद केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनने राज्यातील सर्व संस्था चालकांची 11 आणि 12 जानेवारीला बैठक बोलावली होती. या बैठकीत दोन वर्षापासून करोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीवर चर्चा झाली. तसेच पालक देखील आता शाळा बंद न ठेवण्याची मागणी करत असून करोना रुग्ण नसणार्या भागात शासनाने ठरवून दिलेल्या नियमानूसार आणि पालकांच्या संमतीनूसार शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
नगर जिल्ह्यात देखील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोविड नियमांचे पालन करून सुरू ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांचे आधीच मोठे शैक्षणिक नुकसान झालेले असून पुन्हा ते होवू नये यासाठी सोमवारपासून राज्यातील सर्व संस्था चालकांनी इंग्रजी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात नगरचाही समावेश आहे, असे मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी सांगीतले. यावेळी सचिन मलिक, एस.बी. महाले, सुनील पालवे, सुनील लोटके, विजय शिंदे, यश शर्मा, जयश्री मेहेत्रे, आदर्श धोरजकर, देवीदास गोडसे, अंतरप्रित धुपड उपस्थित होते.
Web Title: All English medium schools will be started in Ahmednagar