अमृतसागर सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभवराव पिचड यांची तर उपाध्यक्ष पदी रावसाहेब वाकचौरे
Akole Amritsagar President Election: शेतकरी विकास मंडळाने 13 जागांवर नेत्रदीपक यश संपादन केले होते.
अकोले: अकोले तालुक्यातील महत्वाची असणारी सहकारी संस्था अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभवराव पिचड यांची तर उपाध्यक्ष पदी रावसाहेब वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने एकतर्फी विजय संपादन केला. या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाचा दणदणीत पराभव केला. या मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास मंडळाने 13 जागांवर नेत्रदीपक यश संपादन केले होते.
अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी करिता आज निवडणूक पार पडली. अध्यासी अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पराय यांनी काम पाहिले. त्यामध्ये अध्यक्ष पदी वैभवराव पिचड व उपाध्यक्ष पदासाठी रावसाहेब वाकचौरे यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड पार पडली. अध्यक्ष पदासाठी पिचड यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक आनंदराव वाकचौरे यांनी मांडली त्यास अरुण गायकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी वाकचौरे यांचे नाव रामदास आंबरे यांनी सूचविले त्यास आप्पासाहेब आवारी यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर भाजपच्या वतीने अमृतसागर दूध संघ कार्यालय परिसरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचा श्रद्धांजली ठराव अ.ता.एज्यु सोसायटी चे अध्यक्ष इंजि सुनिल दातीर यांनी मांडला. यावेळी स्वर्गीय भांगरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष वैभवराव पिचड म्हणाले की, दूध उत्पादकांनी शेतकरी विकास मंडळावर मोठा विश्वास दर्शविला. दूध संघाच्या माध्यमातून मागील 7 वर्षात इतर दूध संघाच्या तूलनेत सर्वाधिक रिबेट दिले. अनेक अडचणींवर मात करीत दूध संघावर कर्जाचा बोजा न करता दूध संघ नफ्यात आणला. उत्पादकांनी पारदर्शी कारभाराला साथ दिली. यापुढील काळात दूध संघाचे नाव राज्यभर होईल त्यासाठी प्रयत्न करू व दूध उत्पादकांचा विश्वास कायम ठेऊ अशी ग्वाही देत पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली त्याबद्दल दूध उत्पादकांचे आभार मानले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, शिवाजीराजे धुमाळ, गिरजाजी जाधव यांची भाषणे झाली. यावेळी अ.ता. एज्यु सोसायटीचे अध्यक्ष इंजि सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, उप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सर्व नगरसेवक, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांचेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. विशेष म्हणजे या निवडीनंतर तालुक्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार केला.
Web Title: Akole Amritsagar President Election
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App