अहमदनगर: कापड व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला
Ahmednagar Crime News: कापड बाजारातील दीपक नवलानी यांच्यावर चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना.
अहमदनगर : कापड बाजारातील दीपक नवलानी यांच्यावर चाकूने सपासप वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण समजू शकले नाही.
व्यापारी दीपक ऊर्फ नवालानी यांचे कापड बाजारातील शहाजी चौकात सिद्धी कलेक्शन नावाचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी दुकानात बसलेले होते. त्यावेळी हातात चाकू घेऊन दोघे दुकानात घुसले व त्यांनी नवलानी यांच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रणिल बोगावत यांच्यावरही हल्लोखोराने हल्ला केला.
नवलानी व बोगावत यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठा जमाव जमला. यावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
व्यापाऱ्यावरील हल्ल्याचा व्यापाऱ्यांकडून निषेध करण्यात आला आहे. बाजारपेठेतील बंदोबस्त वाढविण्यात आल्याने वातावरण निवळले.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह मोठा फौजफाटा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने जिल्हा रुग्णालयातील तणाव निवळला. त्यानंतर काही वेळाने नवलानी यांना जिल्हा रुग्णालयातून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Web Title: Ahmednagar Crime Assault on cloth merchant
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App