अहिल्यानगर: जिल्ह्यात सरासरी 72 टक्के मतदान, पहा तालुक्यानुसार टक्केवारी
Ahilyanagar Assembly Election 2024: माहितीनुसार जिल्ह्यात 12 मतदारसंघात सरासरी 72 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीच्या 12 जागांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात दुपारनंतर मतदानाने वेग घेतला. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ होता. दुपारनंतर मतदानाने वेग घेतला, मतदारांनी घरातून बाहेर पडत मतदान केंद्रांची वाट धरली. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 62.23 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के, तर 3 वाजेपर्यंत 47.85 टक्के मतदान झाले होते. रात्री उशीरा संकलित झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 12 मतदारसंघात सरासरी 72 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मतदानाची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठवली असून आज अधिकृत रित्या ही आकडेवारी जाहिर करण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत वाढलेले मतदान कुणाला फायद्याचे ठरणार याचा उलगडा शनिवारी होणार आहे. गेल्या महिना ते दीड महिन्यांपासून जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. अर्ज माघारीच्या दिवशी 5 नोव्हेंबरला निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. यंदा विधानसभेच्या 12 जागांसाठी 151 उमेदवार निवडणुकीत भविष्य आजमावत होते. यात अनेक तालुक्यात तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती झाल्या. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात प्रचारसभा, आरोप- प्रत्यारोप, मतदारांना विविध आश्वासन यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली होती. यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीची टक्केवारी चांगलीच वाढणार असे चित्र होते. मात्र, पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानात श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डी, नगर शहर आणि श्रीरामपूर मतदारसंघात 60 टक्क्यांच्या आत मतदान झालेले होते.
जिल्ह्यात सर्वात जास्त मतदारांचा निरूत्साहात श्रीगोंदा तालुक्यात दिसून आला. त्याठिकाणी सांयकाळी पाच वाजेपर्यंत 55.48 टक्के मतदान झालेले होते. तर सर्वाधिक मतदान हे नेवासा तालुक्यात 70.49 टक्के झाले होते. त्या खालोखाल अकोले, कर्जत-जामखेड, कोपरगाव, शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघाचा समावेश होता. पारनेर आणि राहुरी तालुक्यात पाच वाजेपर्यंत 61 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. जिल्ह्यात अपवादात्मक घटना वगळता सर्वत्र शांतततेत मतदानाची प्रक्रिया पारपडली. कोठेही मतदान यंत्रण पळवणे, बोगस मतदान झाल्याच्या घटना समोर आल्या नाहीत. शेवगाव तालुक्यात मतदानाचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली अथवा तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, त्या तातडीने सोडवण्यात आल्या. यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पारपडली.
दरम्यान, जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली होती. मतदान प्रक्रिया पारपाडण्यासाठी 21 हजाराहूंन अधिक अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले होते. यासह मतदान केंद्रांवर पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच मतदानासाठी येणार्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली. 12 ही मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळेला मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. रोजच्या कामाला सुरुवात करण्याआधी नागरिक मतदान केंद्र गाठत होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.96 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुढील दोन तासांत म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत 18.24 टक्के मतदान झाले होते. यानंतर मात्र मतदानाचा टक्का वेगाने वाढू लागला. मतदान केंद्रांवर गर्दीही दिसू लागली. मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ मतदान प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेत होते.
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार आ. रोहित पवार यांना मतदान करावे, या उद्देशाने मतदारांना पैशांचे वाटप करताना दोघांना पकडले. जामखेड तालुक्यातील नान्नज व कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारात मंगळवारी सायंकाळी या घटना घडल्या आहेत. त्या दोघांकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ते आ. रोहित पवार यांच्या कारखाना व कंपनीशी संबंधीत हे कर्मचारी असल्याचे समजते. याप्रकरणी कर्जत व जामखेड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर बुधवारी कर्जत येथील लकी हॉटेलमध्ये संजय खंडप्पा खांडेकर (रा. कोंडवा बुद्रुक, पुणे) याच्याकडील चार लाख 29 हजार 500 रूपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती आ. राम शिंदे यांची नातेवाईक असून तो पैसे वाटत करत होता असा आरोप शिवसेनेचा आरोप आहे. दरम्यान, दक्षिणेतील नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड आणि शेवगाव-पाथर्डीत किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पारपडले.
जिल्ह्यात झालेले मतदान
नेवासा 79.89 टक्के, अकोले 71.97 टक्के, कर्जत-जामखेड 75.15 टक्के, कोपरगाव 71.47 टक्के, शिर्डी 74.52 टक्के, संगमनेर 74.57 टक्के, पारनेर 66.27 टक्के, राहुरी 74.50 टक्के, श्रीरामपूर 70.12 टक्के, नगर 63.85 टक्के, शेवगाव 68.21 टक्के, श्रीगोंदा 72.28 टक्के.
Web Title: Ahilyanagar 72 percent average voter turnout Assembly election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study