महिलेचा अंत्यविधी झाल्यावर स्मशानभूमीतून राख गायब
Pathardi: अंत्यविधी ठिकांणची अर्ध्याहून अधिक राख अज्ञात व्यक्तींनी गायब केल्याचे निदर्शनास.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथून विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. अंत्यविधीची राख गायब झाल्याची बाब समोर आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील स्मशानभूमीत एका महिलेचा सोमवारी(दि.12) दुपारच्या सुमारास अंत्यविधी झाला त्यानंतर दुसर्या दिवशी त्या कुटुंबातील व जवळचे नातेवाईक सावडण्यासाठी स्मशानभूमीत आले असता अंत्यविधी ठिकांणची अर्ध्याहून अधिक राख अज्ञात व्यक्तींनी गायब केल्याचे निदर्शनास आले. परंतु दुःखद घटना असल्यामुळे कोणीही जाहीरपणे यावर वाच्यता केली नाही.
यापूर्वी देखील गावातील काही महिलांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्या महिलांची देखील राख रात्रीतून अज्ञातांनी गायब केल्याची चर्चा या निमित्ताने समोर आली आहे. करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरासमोरील स्मशानभूमीतच बहुतांश मयत व्यक्तींचा अंत्यविधी केला जातो. यामध्ये पुरुषांचा अंत्यविधी झाल्यानंतर मात्र राख गायब झाल्याचे अद्याप तरी निदर्शनास आलेले नाही.
परंतु एखाद्या महिलेचा अंत्यविधी झाल्यानंतर मात्र रात्रीतून राख गायब होण्याचे प्रकार वारंवार होऊ लागल्याने त्या प्रत्येक संबंधित कुटुंबाच्या भावनांना देखील यामुळे ठेच पोहोचत असून कोणीतरी मयत व्यक्तीच्या अंगावरील सोने-चांदीच्या दागिन्याच्या हव्यासापोटी असले प्रकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Title: After the funeral of the woman, the ashes disappeared from the cemetery