अहिल्यानगर: जीप-दुचाकी धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: आढळगाव परिसरात जीप आणि दुचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले.
आढळगाव : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर आढळगाव परिसरात जीप आणि दुचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. रविवारी (दि.४) रात्री साडेदहाच्या सुमारास अपघात झाला.
अतुल एकनाथ शिंदे (वय ३०), रोहित भरत शिंदे (वय २२) अशी मयतांची नावे असून, दोघेही आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी होते. धडक दिलेले वाहन आणि वाहन चालकास ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी मयताच्या नातेवाइकांनी आढळगाव येथे अचानक रास्ता रोको आंदोलन केले. चार तास आंदोलन चालले. सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, पोलिस कर्मचारी सचिन गोरे, दत्तात्रय शिरसाठ यांनी रास्ता रोको करणाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
श्रीगोंद्यावरून आढळगावच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना त्याच दिशेने येणाऱ्या जीपने जोराची धडक दिली. धडकेमुळे दोघेही जागीच गतप्राण झाले, तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली
रास्ता रोको आंदोलन
गावातील जाणकार तरुणांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून एका चारचाकी जीपवर संशय व्यक्त केला. आढळगावातील दुकाने बंद करून अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन आणि वाहन चालकास ताब्यात घेण्याची मागणी करत, मयताच्या नातेवाइकांनी श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्ग आढळगाव येथे रोखला. चार तास वाहतूक रोखून धरल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Breaking News: Accident Jeep-two-wheeler crash, both dead