Home संगमनेर बाळासाहेब थोरातांच्या चार दशकांच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी; विखे पाटील परिवर्तन करणार...

बाळासाहेब थोरातांच्या चार दशकांच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी; विखे पाटील परिवर्तन करणार का?

Sangamner Election 2025: विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने यावेळी महायुतीच्या देखील अपेक्षा उंचावल्या असून विखे पिता-पुत्रांच्या साथीने पालिकेत देखील परिवर्तन करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले.

Preparations to shake up Balasaheb Thorat's four decades of power

संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व काळात 1860 सालापासून स्थापन झालेल्या संगमनेर नगरपालिकेत गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. या नगरपालिकेत यंदा महायुतीचे आव्हान असणार आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या या पालिकेत दोन टर्म थोरात यांच्या बहीण आणि सत्यजित तांबे यांच्या आई दुर्गा तांबे नगराध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने यावेळी महायुतीच्या देखील अपेक्षा उंचावल्या असून विखे पिता-पुत्रांच्या साथीने पालिकेत देखील परिवर्तन करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

काँग्रेस पक्षातून निलंबित असलेले डॉ. सुधीर तांबे व अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार असण्याची चर्चा असून यावेळी महाविकास आघाडी ऐवजी शहर विकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाईल अशी चर्चा आहे. तांबे पिता-पुत्र काँग्रेसमधून निलंबित असल्याने काँग्रेसच्या चिन्हावर प्रचार करणे त्यांना जमणार नाही आणि त्यामुळेच शहर विकास आघाडी करून नवीन चिन्ह घेत काँग्रेस पक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी देखील सावध प्रतिक्रिया देत निवडणुकीबाबत स्वतंत्र टीमची स्थापना करण्यात आली असून, सर्वांना सामावून घेत लवकरच पुढे कसे जायचे? याबाबत निर्णय घेतला जाईल हे स्पष्ट केलं. तर शहर विकास आघाडीबाबत देखील बोलताना ज्यांच्यावर जबाबदारी दिलीय ती टीम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली यांच्या नावाबाबत एकमत होण्याची शक्यता असून काँग्रेसमधून निलंबित असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले. तर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चावर भाष्य करताना राजकीय निर्णय घेण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा घेतले जातील, असे वक्तव्य करत त्यांनी पक्ष प्रवेशाबद्दल संभम कायम ठेवलाय.

एकीकडे महाविकास आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी दुसरीकडे महायुतीने मात्र एकत्र निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केलीय. सुजय विखे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेत एकत्रित निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असून सेनेचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. विधानसभेप्रमाणेच नगरपालिकेत देखील जनता परिवर्तन करणार, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त करताना विधानसभेत ते गाफिल राहिल्याचं आज सांगतात. मात्र पुन्हा एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

एकीकडे थोरात व तांबे यांच्यासमोर सत्ता टिकविण्याची प्रतिष्ठा असून महाविकास आघाडी ऐवजी शहर विकास आघाडी झाल्यास आघाडीतील मित्रपक्ष देखील वेगळी भूमिका घेऊ शकतात. एक मात्र नक्की आहे निवडणूक कोणतीही असली तरी थोरात विरुद्ध विखे यांच्या वर्चस्वाची ही लढाई असणार. आता कोणाचे पारडे जड भरणार हे वेळच ठरवेल.

Breaking News: Preparations to shake up Balasaheb Thorat’s four decades of power

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here