अहिल्यानगर: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: ऊस तोडणी मजुराच्या तीन वर्षीय मुलीला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने ठार केले.

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा रेल्वे स्टेशनजवळ तळेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक येथून आलेल्या ऊस तोडणी मजुराच्या तीन वर्षीय मुलीला बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने ठार केले. त्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. त्यांनी नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. वन विभागाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. नंदिनी प्रेमदास चव्हाण (वय 3) असे मयत बालिकेचे नाव आहे.
टाकळी शिवारात नांदगावहून प्रेमदास चव्हाण हे ऊस तोडणीसाठी कुटुंबासह आले होते. बुधवार, 5 नोव्हेंबरला रात्रीच्या वेळी त्यांची मुलगी नंदिनी खेळत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. तिला शेतात ओढत नेले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला. नंदिनीचा मृतदेह बराच शोध घेत शेतातून बाहेर आणला. त्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. त्यांनी मृतदेह घेऊन टाकळी फाटा येथे नगर-मनमाड महामार्गावर (रस्तारोको आंदोलन सुरू केले. जोपर्यंत वन विभाग बिबट्याला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत येथून हालणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
युवा नेते विवेक कोल्हे , सुमित कोल्हे ग्रामस्थांमध्ये सहभागी झाले. त्यांनी वनक्षेत्र अधिकारी रोडे यांना जाब विचारला. वन अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कोल्हे त्यांच्यावर संतापले. वन अधिकार्यांनी बिबट्याला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान आ. आशुतोष काळे यांनी नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. टाकळी गावाच्या परिसरात बुधवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बदोबस्त करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी वनमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली.
Breaking News: Toddler dies in leopard attack
















































