अकोलेत कारने दोघांना चिरडले; एकाचा मृत्यू
Breaking News | Akole Accident: चारचाकी वाहन चालवून रस्त्याने पायी जाणार्या दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच अकोले शहराजवळ घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

अकोले: बेदरकारपणे आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन चालवून रस्त्याने पायी जाणार्या दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच अकोले शहराजवळ घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसर्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये पायी जाणारे दिलीप लक्ष्मण घुले (वय 58, रा. अकोले) यांचा मृत्यू झाला आहे. तर राजेंद्र लिंबा डोके (रा. खानापूर) हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की 27 ऑक्टोबर, 2025 रोजी सायंकाळी 7 ते 7.15 वाजेच्या दरम्यान शहराजवळ अकोले-देवठाण रस्त्यावर भरधाव वेगाने एक कार आली. या कारच्या मद्यधुंद चालकाने विठ्ठल लॉन्ससमोर एकाला व विघ्नहर्ता अॅग्रो दुकानासमोर एकाला अशा दोघांना उडवून देत पसार झाला होता. यात दिलीप घुले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र डोके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेनंतर मयताचा मुलगा अक्षय दिलीप घुले यांनी अकोले पोलिसांत फिर्याद देऊन सुरुवातीला अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहे.
Breaking News: Car crushes two in Akole one dies
















































