पाळत ठेवून घराजवळ गाठलं, तरुणाची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
Breaking News | Nashik Crime: दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घराजवळच अमोलला अडवले आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण घराजवळच तो कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जीव गेला.

नाशिक: गुरूद्वारात सेवा करून तो निघाला आणि पुढील काही वेळातच त्याचा जीव गेला. गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवत असलेल्या दोन व्यक्तींनी ४१ वर्षीय अमोल शंकर मेश्राम याची हत्या केली. नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घराजवळच अमोलला अडवले आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण घराजवळच तो कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जीव गेला. ज्यावेळी अमोल मेश्राम घराच्या दिशेने पळत होता, तेव्हाच त्याचे आईवडील तिथे आले. त्यांनी पळता पळता खाली पडलेल्या अमोलला बघून एकच हंबरडा फोडला आणि परिसरातील लोक जमा झाले.
घर खरेदी-विक्रीच्या जुन्या वादातून डावखरवाडी येथील रहिवासी असलेल्या अमोल शंकर मेश्राम (वय ४१) यास दुचाकीने आलेल्या दोघांनी मंगळवारी (७ ऑक्टोबर) अडवून धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अमोलला नागरिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जयभवानी रोड परिसर हादरला आहे.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत तपासाला गती दिली. पोलिसांनी काही तासात दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक अल्पवयीन असून दुसरा संशयित कुणाल सौदे (२१, रा. फर्नाडिसवाडी) याच्यासोबत फ्लॅट खरेदी-विक्रीच्या माध्यमातून जुना वाद असल्याच्या कारणावरून मेश्राम याच्यावर त्याने चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करून ठार मारल्याची कबुली दिली आहे, असे पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले.
अमोल याच्यावर हल्लेखोरांनी शस्त्राने वार केल्यानंतर त्याने जखमी अवस्थेत घराच्या दिशेने धावायला सुरुवात केली; मात्र काही अंतरावर तो कोसळला.
त्याची आई नीलिमा व वडील शंकर मेश्राम हे दोघेही नित्यानंद आश्रमात दर्शनासाठी गेले होते. घराजवळ गर्दी बघून गाडीतून त्यांनी खाली उतरून बघितले असता त्यांना आपल्या रक्तबंबाळ मुलाला बघून धक्का बसला. रक्ताच्या थारोळ्यात 3 कोसळलेल्या मुलाला बघून त्यांनी हंबरडा फोडला. वडिलांनी धीर देत नागरिकांच्या मदतीने तातडीने अमोलला रुग्णालयात हलविले; मात्र त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मेश्राम राहत असलेल्या सद्गुरूनगरमधील साबरमती अपार्टमेंटजवळच रस्त्यावर हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार करत पलायन केले होते. त्याचे वडील रेल्वे टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून भाऊ दुबईमध्ये नोकरी करतो. याप्रकरणी त्याचे वडील शंकर मेश्राम (७०) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुणे महामार्गावरील गुरुद्वारामध्ये अमोल मेश्राम हा दररोज नित्यनेमाने सेवा करण्यासाठी पहाटे जात होता. मंगळवारीही तो सेवा करून घराकडे परतत असताना हल्लेखोरांनी त्याला रस्त्यातच गाठले. या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर वाँच ठेवून हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये तीन खुनाच्या घडल्याने नाशिकचे बिहार होते की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
Breaking News: Murder Young man stabbed to death in broad daylight
















































