संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले, राष्ट्रवादी नेत्याचा आरोप
Maharashtra Assembly Elections 2024: श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तिकीट अनुराधा नागवडे यांना विकले आहे, असा थेट आरोप श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार राहुल जगताप यांनी केला.
श्रीगोंदा: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तिकीट अनुराधा नागवडे यांना विकले आहे, असा थेट आरोप श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार राहुल जगताप यांनी केला आहे. (Shivsena Sanjay Raut)
राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी त्यांना मुंबईत उद्धवसेनेत प्रवेश केला. उद्धवसेनेकडून श्रीगोंदा मतदारसंघासाठी एबी विधानसभा फॉर्मही नागवडे यांना देण्यात आला. याबाबत राहुल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, नागवडेंचा सेनेत प्रवेश होण्यापूर्वी त्यांचा एबी फॉर्म तयार केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही सामान्य कार्यकत्यांना न्याय देणारी होती. मात्र, संजय राऊत यांनी ‘द्या खोके आणि उमेदवारी एकदम ओके’ असे सूत्र राबविले आहे. हे लोकशाहीला घातक आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझे राजकारणातील श्वास आहेत. अनेक अडचणी आल्या, पण त्यांची साथ सोडली नाही. पवारांची श्रीगोंद्याच्या जागेबाबत काय अडचण होती मला माहीत नाही. माझा त्यांच्यावर कोणताही रोष नाही, असे जगताप यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत काय करायचे यावर कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
नागवडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव सेनेत प्रवेश केला. नागवडे यांनी एका हातात शिवबंधन बांधल्यानंतर दुसऱ्या हाती त्यांना तत्काळ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्मही देण्यात आला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नागवडे यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला होता. त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. अजित पवार गडाकडून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. भाजपने श्रीगोंदा विधानसभा मतदासंघात प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नागवडे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. अखेर बुधवारी दुपारी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, साजन पाचपुते यांच्या हस्ते राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे, आदेश नागवडे यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी सतीश मखरे, बंडू जगताप, डी. आर. काकडे, सावता हिरवे, भाऊसाहेब नेटके, संदीप औटी, शरद जगताप, बंडू पंधरकर आदी उपस्थित होते.
Web Title: Maharashtra Assembly Elections 2024 shrigonda shivsena
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study