भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाच्या सरी सुरु, इतके टक्के पाणीसाठा
Breaking News | Akole: आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने 24 तासांत धरणात नव्याने विक्रमी 521 दलघफू पाण्याची आवक.
भंडारदरा: उत्तर नगर जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारी रात्रीपासून आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने 24 तासांत धरणात नव्याने विक्रमी 521 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 2510 दलघफू (22.73 टक्के) झाला होता. काल दिवसभरही पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने रविवारीही पाण्याची आवक अधिक होण्याची शक्यता आहे.
डोंगररांगा धुक्यांनी लेपाटून गेल्या असून पाणलोटात आषाढ सरी जोरदार बरसत असल्याने डोंगरदर्यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप घेऊ लागले आहेत, त्यामुळे ओढे-नाले भरभरून धरणात विसावत आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासात धरणात नव्याने 291 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी आवर्तनापोटी 31 दलघफू पाणी खर्ची पडले. तर 260 दलघफू पाणी धरणात विसावले. दिवसभर घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पाऊस जोरदार कोसळत असल्याने सायंकाळी संपलेल्या 12 तासांत आणखी 230 दलघफू पाणी नव्याने आले.
गत 24 तासांत धरणात नव्याने 521 दलघफू पाणी आले. या हंगामातील आतापर्यंतचा विक्रम आहे. भंडादरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 19 मिमी झाली आहे. गत 24 तासांत पडलेला पाऊस भंडारदरा 14, घाटघर 62, पांजरे 47 आणि रतनवाडी 56 मि.मी.आहे. 112 दलघफू क्षमतेचे वाकी तलावही ओव्हरफ्लो झाला असून 556 क्युसेकने पाणी सुरू आहे. यामुळे आता निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक वाढु लागली आहे. दरम्यान, शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांनी भंडारदरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी गर्दी करत आहेत.
Web Title: Rain showers begin in the catchment area of Bhandardara Dam
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study