नगरमध्ये भाजप व आपचे कार्यकर्ते परस्परांना भिडले; घोषणायुद्ध
Breaking News | Ahmednagar: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक.
नगर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूने घोषणायुद्ध रंगले, नंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परस्परांना भिडले , मात्र कोणताही अनुचित प्रकार होण्याआधीच शहर पोलिसांनी हस्तक्षेप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना मद्य धोरणघोटाळा संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई करत काल, गुरुवारी अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने देशभर आंदोलन सुरू केले आहे. आज, शुक्रवारी पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र आघाव, मनोज गोपाळे, भरत खाकाळ, संतोष नवलाखा, भैरवनाथ बारस्कर, सुभाष केकान आदी कार्यकर्ते नगर शहरातील भाजप (BJP) कार्यालयासमोर जमा झाले. त्यांच्या हातात निषेध फलक होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात गांधी मैदानाजवळ शहर भाजपचे कार्यालय आहे. तेथे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, संघटन सरचिटणीस सचिन पारखी व इतर दोन-चार कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप कार्यालयासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने सुरू केली. ‘मोदी-शहा चोर है’ अशाही घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने आणखी कार्यकर्त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. भाजपचे महेश नामदे, वसंत लोढा, रामदास आंधळे, मयूर बोचूघोळ, प्रशांत मुथा आदी पदाधिकारी तेथे धावले.
काही वेळातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले व त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. भाजप कार्यकर्त्यांकडून ‘केजरीवाल चोर है’ तर आपच्या कार्यकर्त्यांकडून ‘मोदी-शहा चोर है’ असे प्रत्युत्तर दिले जात होते. घोषणाबाजी वाढून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परस्परांना भिडले होते, मात्र त्याचवेळी कोतवाली पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. नंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले.
Web Title: Chief Minister Arvind Kejriwal arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study