Accident: पुणे नाशिक महामार्गावर घाटात भीषण अपघात, १ ठार, ३ जखमी
Accident news: ट्रकची दोन वाहनाच्या धडकेने अपघात.
राजगुरुनगर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात भरधाव मालवाहतूक ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालवाहतूक ट्रकही रस्त्यावर उलटला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ट्रकचालकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशोक दगडू विश्वास (रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्याचे तर विश्वास टिंगरे, रुपाली टिंगरे (रा. खानवस्ती, मंचर, ता. आंबेगाव) व एक महिला असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. राजू दुधवडे (रा. वडगाव आंनद, ता, जुन्नर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
मालवाहतूक ट्रक हा इंदूर येथून शिक्रापूर-सणसवाडी येथे गव्हाचा आटा घेवून निघाला होता. पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नवीन खेड बाह्यवळण घाटात ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रकने एका पिकअप वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पिकअप गाडीचा चेंदामेंदा होऊन तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, निरगुडसर येथील अशोक विश्वास हे खेडकडे दुचाकीवर निघाले असताना मालवाहतूक ट्रकची धडक बसल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला. दोन्ही अपघात घडल्यानंतर ट्रक पुढे 300 मिटर अंतरावर जाऊन रस्त्यावरच उलटला. ट्रकमधील गव्हाचा आट्याचे बॉक्स रस्त्यावर ओसंडले होते.
Web Title: accident in Ghat on Pune Nashik Highway, 1 killed, 3 injured