संगमनेर: पतीने प्रेयसीच्या मदतीने पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
Sangamner Crime: पतीने गोठ्यातून गोचिडाचे औषध आणून आज शिवानीचा विषय संपवून टाकायचा असे म्हणत मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने औषध पाजले.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे एका २४ वर्षीय विवाहित महिलेला पतीने प्रेयसीच्या मदतीने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी सदर विवाहितेचा पती, सासू व पतीची प्रेयशी अशा तिघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिवानी दीपक जोशी हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझे पती व एका महिलेचे प्रेमसंबध असून ते लोणी येथे खोली घेऊन राहत असल्याची माहिती मला मिळाली होती. दि. 8 जुलै रोजी मी दुपारच्या सुमारास त्याठिकाणी त्या दोघांनाही एकत्र धरल्यामुळे आमच्यात मोठा वाद झाला. त्यामुळे पती, सासू व ती महिला हे संध्याकाळी दाढ खुर्द याठिकाणी आले. तू मला लागत नाही, तू निघून जा, मला या महिलेशी लग्न करायचे असून आमच्यात अडसर करू नको असे पती म्हणाला.
मी या गोष्टीला विरोध केला असता पती व त्याच्या प्रेयसीने मला खाली पाडले. यावेळी मी ओरडू लागल्याने सासूने मला दाबून धरले व त्या पतीच्या प्रेयसीने माझे दोन्ही हात धरले होते. यावेळी पतीने गोठ्यातून गोचिडाचे औषध आणून आज शिवानीचा विषय संपवून टाकायचा असे म्हणत मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने औषध पाजले, असा जबाब लोणी येथे रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या शिवानी संजय जोशी यांनी पोलिसांना दिला आहे.
याबाबत शिवानी जोशी हिने दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी दीपक संजय जोशी, कल्पना संजय जोशी (दोघे रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व आशा डोखे (रा. मांडवे साकूर, ता. संगमनेर) व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 129/2022 नुसार भारतीय दंड संहिता कलम 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून आरोपी पतीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Title: Sangamner Crime Husband tries to kill his wife with a poisonous drug with the help of his girlfriend