टँकरखाली चिरडून 26 वर्षीय डॉक्टरचा तडफडून मृत्यू
Breaking News | Pune Accident: भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना.
पुणे : भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना पुणे येथील हडपसर-सासवड रस्त्यावर सातववाडी बस थांब्यासमोर घडली. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते, तरीसुद्धा अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. ईश्वर साहू (वय 26 वर्ष, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक राजेंद्र एकनाथ तळेकर (वय 51, रा. वीर, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. आप्पासो भीमराव सबळकर (वय 40, रा. वेताळबाबा, गाडीतळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी डॉ. ईश्वर साहू हडपसरच्या दिशेने येत होते. सातवडी पीएमपी बस थांब्यावर एक बस थांबली होती. त्याच्या पाठीमागे साहू होते. पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने डॉ. साहूंचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. नागरिकांनी धाव घेऊन रुग्णवाहिका व पोलिसांना बोलावून घेतलं आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालक राजेंद्र तळेकर याला अटक करण्यात आली आहे.
Web Title: 26-year-old doctor dies after being crushed under tanker